सद्गुरू परंपरा
प. पू. श्री. गडबोले महाराजप.पू.श्रीकाका महाराजांचे सद्गुरू , प.पू.श्रीगडबोले महाराज हे मूळचे कोकणातले. बालपणीच , म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षीच ते कोकण सोडून पुण्याला आले. अत्यंत खडतर परिस्थितीत , अतिशय कठीण परिश्रमांनी जीवन निर्वाह करीत असताना लहान वयातच त्यांना जीवनाचे गूढ शोधण्याची ओढ लागली. आणि त्यासाठी त्यांनी , पुण्यातील पाताळेश्वर येथे १२ वर्षे तीव्र साधना केली. कठीण साधनेच्या मुशीतून तावून-सुलाखून प.पू.श्रीगडबोले महाराजांची साधना सिध्द झाली , त्यांच्या साधनेला सोन्याची झळाळी आली. त्यानंतर श्रीगडबोले महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठीच वेचले. आयुष्यभर आपला देह लोकांसाठी झिजवला. त्यांनी कित्येकांचे अश्रू पुसले , असंख्य लोकांना दुःखमुक्त करून आनंदी व समाधानी केले. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक व प्रसन्न होते. त्यांची विचारधारा अतिशय सकारात्मक आणि पुरोगामी होती. १९८१ साली, आषाढी एकादशीला , वयाच्या १०५ व्या वर्षी प. पू. श्रीगडबोले महाराजांनी देह ठेवला. |

