अमृतधारासत्संगामध्ये , लोकांच्या प्रापंचिक आणि आध्यात्मिक शंकांचे निराकरण करताना प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज जे मौलिक विचार मांड्त असतात , त्यातील काही विचार पुस्तकरूपानी , ’अम्रुतधारा – भाग १’ मधून प्रकाशित केले आहेत. हे पुस्तक श्रीकाका महाराजांनी स्वतः लिहिले असून ते मराठी भाषेत आहे. ’नामसाधना व सद्गुरू तत्व’ हा या पुस्तकातील मुख्य धागा अहे. ( हे पुस्तक इंग्रजी , हिंदी , तेलुगु इ. भाषांमधेही उपलब्ध आहे. ) त्याचबरोबर , श्रीकाका महाराजांनी सत्संगात सांगितलेल्या मौलिक व प्रेरणादायी विचारांना संकलित करून , त्यांना पुस्तकरूपात शब्दबध्द करण्यात आलं आहे. श्रीकाका महाराजांचे विचार या पुस्तकांत प्रश्नोत्तरांच्या माध्यमात असून , ’मंथन – अम्रुतधारा भाग २ , भाग ३ , भाग ४’ इत्यादी ३ भागांत ही पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच ’भाग ५’ चे काम सुरु आहे. असे म्हणतात , अम्रुताचे प्राशन केल्याने अमरत्व प्राप्त होते. प. पू. श्रीकाका महाराजांचे अम्रुतमय विचारही निराश , दुःखी , मरगळलेल्या मनांना नवसंजीवनी देण्याचे कार्य करतात. श्रीमहाराजांच्या अनमोल विचाररूपी अम्रुताची ही अविरत धारा आपल्याला अजर , अमर अशा सद्गुरू तत्वापर्यंत नेण्याचे कार्य करते , आपल्या आयुष्यात समाधान व मनःशांती आणते , भयमुक्त व खंबीर जीवन प्रदान करते. या पुस्तकांमधून , नाम म्हणजे काय , नाम घेण्यासाठी काय पात्रता लागते , नामस्मरणानी आपल्यावर काय परिणाम होतो इत्यादी नामसाधकाला पडणा-या अनेक प्रश्नांचे निराकरण केले आहे. श्रीकाका महाराजांनी , “नाम आणि सद्गुरू ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत” असं सांगताना नामसाधनेत सत्संगाचे महत्व , सद्गुरूंचे अनन्यसाधारण महात्म्य , सद्गुरूंशी अखंड अनुसंधान इत्यादी गोष्टींचे विवेचन केले आहे. याबरोबरच , दैनंदिन जीवनात माणसाचं वर्तन कसं असावं , मनाची शांती कशी प्राप्त करता येईल , आजच्या तणावग्रस्त जीवनात मन खंबीर आणि निर्भय कसं होईल , तसेच जुन्या - जाचक रूढी – परंपरांचा बागुलबुवा का व कसा दूर केला पाहिजे इत्यादी दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवरही मार्गदर्शन केलं आहे. नामसाधकांसह सर्वांसाठीच ’मंथन – अम्रुतधारा’ ची ही सर्व पुस्तके अतिशय उपयुक्त व मार्गदर्शक आहेत. प. पू. श्रीकाका महाराज नेहमी म्हणतात की , “अम्रुतधारा हे पुस्तक एखाद्या कादंबरीप्रमाणे , एका बैठकीत वाचण्याचे नसून , त्यातील प्रत्येक प्रकरणाचे सतत चिंतन व मनन केल्याने दर वेळेस ते नव्याने कळत जाईल आणि त्यातला विषय अधिकाधिक उलगडत जाईल.” श्रीकाका महाराज असेही सांगतात की , “तुमच्या मनात निर्माण होणा-या कोणत्याही प्रश्नाला ’अम्रुतधारा’ नक्कीच उत्तर देईल. तुम्ही एखादा प्रश्न मनात धरून डोळे मिटा आणि आपल्या आत असलेल्या सद्गुरूंना तो प्रश्न विचारा , नंतर अम्रुतधारातलं कोणतंही पान उघडून त्यात सांगितलेल्या विचारांचे प्रामाणिकपणे चिंतन व मंथन केलंत तर नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडेल.” |

