श्रीसद्गुरू उपदेशप. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज म्हणतात , “मनुष्याचे प्रश्न कधीच संपत नाहीत. येणा-या प्रश्नांपासून , संकटांपासून दूर पळून न जाता , त्या प्रश्नांना , संकटांना समर्थपणे तोंड देण्याची , त्यांचा सामना करण्याची , त्यांच्यावर मात करण्याची शक्ती , साहस नामसाधनेनेच प्राप्त होते. ती शक्ती अंधश्रध्देच्या मार्गाने , तंत्र-मंत्र , अघोरी प्रथा-परंपरा-साधना , दुस-यांना त्रास देऊन अथवा बळी-उतारे देऊन येत नाही , हे सर्व अमानवी उपाय आहेत. केवळ नामसाधना हाच सर्वात श्रेष्ठ , सोपा मार्ग आहे. नामसाधनेच्या मार्गानी त्या प्रश्नांना बरोबर घेऊन , आनंदाने व निर्भीडपणे जीवन जगण्याची कला सद्गुरू शिकवतात.” त्याचबरोबर श्रीकाका महाराज म्हणतात , “माणसाने माणसाशी माणसासारखे वर्तन ठेवावे. स्वतःच्या सुखाबरोबर दुस-यांच्या सुखाचाही विचार केला पाहिजे. दुस-यांच्या चेह-यावरचा आनंद बघून आपल्याला होणारा आनंद हाच खरा आनंद असतो. आणि हा आनंद मिळवण्यासाठी लागणारी विचारधारा , मनोवस्था ही सत्संगानीच प्राप्त होते. तसेच , आजच्या तणावग्रस्त , अनिश्चिततेच्या काळात केवळ सद्गुरूंचा सत्संगच माणसाला भयमुक्त आयुष्याचा मार्ग दाखवतो.” श्रीसद्गुरूंची अम्रुतवाणी (१०-०८-२०२०)सद्गुरूंचे स्थान सर्वात श्रेष्ठ असते. ईश्वरापेक्षाही सद्गुरूंचे स्थान वरचे असते. आपण ईश्वराला पाहू शकत नाही, त्याच्याशी बोलू शकत नाही. सद्गुरू आपल्यामधे आपल्यासारखेच होऊन राहतात. आपण त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांना पाहू शकतो. सद्गुरू आणि ईश्वर एकच आहेत. सद्गुरूच आपल्यासाठी सर्व करत असतात. सद्गुरूंच्या घरात सर्वांना मुक्त प्रवेश असतो. त्यांच्याकडे कोणताही भेदभाव नसतो. सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी त्यांना काही द्यावं लागत नाही. पैसा, भेटवस्तू इ. काही लागत नाही. तर फक्त शुध्द भाव त्यांना लागतो. त्याच्या शिकवणीप्रमाणे आचरण ठेवून, त्याच्या स्मरणात सतत राहून, त्यांनी दिलेलं नाम सतत घेऊन त्यांची प्रसन्नता प्राप्त करून घेता येते. श्रीसद्गुरूंची अम्रुतवाणी (२७.०७.२०२०)गुरु आणि सद्गुरू यांच्यामध्ये फरक काय आहे ? गुरु हे ठराविक साच्यात, ठराविक पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकवतात. बौध्दिक पात्रता, आकलन शक्ती, ग्रहण क्षमता ही प्रत्येक विद्यार्थ्याची भिन्न असते. पण सर्वांना समान पध्दतीनेच शिकवले जाते. त्यामुळे काही ठराविक विद्यार्थीच पुढे जातात. सद्गुरू प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्या व्यक्तीला शिकवण देतात आणि त्या व्यक्तीला घडवत असतात. सद्गुरू प्रत्येक व्यक्तीला पुढे नेतात. सद्गुरूंकडे कोणताही भेदभाव नसतो. त्यांना शरण आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं ते कल्याण करतात. आपल्यातल्या ज्ञानाची आपल्याला ओळख करून देण्या आधी सद्गुरू आपल्यात असलेली दोषांची घाण स्वच्छ करतात. आपलं मन निर्मळ बनवतात व मग खर्या स्वरूपाची ओळख करून देतात. गुरु हे मर्यादित विषयांचीच ओळख देतात पण सद्गुरू प्रत्येक व्यक्तीचं संपूर्ण आयुष्यच घडवत असतात. गुरु हे सद्गुरू असतीलच असं नाही, पण सद्गुरू हे गुरुही असतात. सद्गुरू आपल्याला अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड घालायला शिकवतात व आपले संपूर्ण जीवन आनंदी आणि समाधानी करतात. ह्या सदरातील श्रीसद्गुरूंचा संदेश दर १५ दिवसांनी बदलण्यात येईल. या संदेशावर आपले विचार व प्रश्न खालील संकेतस्थळावर पाठवावेत. संकेतस्थळ :- info@shrikakamaharajsewaparivar.org |

