English | मराठी
अमृतधारा
सत्संग
इतर साहित्य

सत्संग

सत्संग हा शब्द सतç आणि संग या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. सतç म्ह्णजे सत्य (शाश्वत सत्य) आणि संग म्हणजे संगती , सख्य , सहवास. हिंदू तत्वज्ञानानुसार प्रत्येक सजीवात आणि निर्जीवात ईश्वर चैतन्य रूपाने वास करतो आणि ते चैतन्य हेच एकमेव असं चिरंतन , शाश्वत सत्य आहे. सद्गुरूपदाला पोचलेल्या व्यक्ती ह्या अशा व्यक्ती असतात ज्यांना त्यांच्यातल्या चैतन्यरूपी ईश्वराची ओळख झालेली असते , म्हणजेच शाश्वत आनंदाची ओळख झालेली असते. या शाश्वत आनंदाची ओळख केवळ सद्गुरूच आपल्यालाही करून देऊ शकतात. केवळ सद्गुरूच त्या चैतन्यरूपी ईश्वराची अनुभूति आपल्याला देऊ शकतात. पण त्यासाठी सद्गुरूंच्या सत्संगाची कास धरणे अत्यंत आवश्यक आहे. सत्संग म्हणजे सद्गुरूंच्या शिकवणीचा अंगीकार करून , सद्गुरूंच्या विचारांचे सतत मनन करून , प्रत्यक्ष सद्गुरूंचं अखंड चिंतन करून , सद्गुरूंच्या सहवासात राहणे आणि त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करणे.

प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या सांईमंदिरात दर मंगळवारी सत्संगाचे आयोजन केले जाते. समाजातल्या विविध स्तरातील लोक या सत्संगात सहभागी होतात. विविध संस्क्रुतींचे , विविध जाती-धर्मांचे , विविध पंथांचे लोक श्रीकाका महाराजांचे अनुयायी आहेत. स्वतः श्रीकाका महाराज भक्तांना मार्गदर्शन करतात. सत्संगात सहभागी होणा-या भक्तांना / साधकांनाही आपले विचार मांडण्यासाठी श्रीकाका महाराज उद्युक्त करतात , प्रोत्साहन देतात. अगदी युवा वर्गापासून व्रुध्दांपर्यंत कोणीही आपले विचार मोकळेपणानी सत्संगात मांडू शकतात हे इथल्या सत्संगाचं एक अतिशय महत्वाचं वैशीष्ट्य आहे आणि हेच या सत्संगाचं वेगळेपणही आहे.

श्रीकाका महाराज म्हणतात , “सद्गुरू हेच ईश्वर आहेत आणि हे सद्गुरू तत्व प्रत्येकाच्या ह्रदयात वास करून असतं. ज्यांना त्यांच्यातल्या सद्गुरू तत्वाची ओळख झालेली आहे अशा सद्गुरूपदाला पोचलेल्या व्यक्ती ह्या नश्वर किंवा अशाश्वत असतात , पण त्यांच्या आत वास करणारं तत्व शाश्वत , चिरंतन असतं. भगवंताचं अखंड नामस्मरण , हा आपल्यातील सद्गुरू तत्वाची ओळख करून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.” श्रीकाका महाराज नामसाधनेचे महत्व सांगताना म्हणतात , “नाम घ्यायला वेळ-काळ , जात-पात , गरीब-श्रीमंत , स्त्री-पुरुष , उच्च-नीच , लहान-मोठा इत्यादी कसलेही बंधन नाही. कोणालाही आणि कधीही नामस्मरण करता येते. रोजची व्यावहारिक कामे करतानाही नाम घेता येते. फक्त नाम हे प्रेमानी , सद्गुरूंच्या अखंड अनुसंधानात आणि नामाला कंटाळा येईपर्यंत घेतले पाहिजे. ”

’नामसाधना आणि सद्गुरू तत्व’ हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून , दैंनंदिन व्यवहारातील उदाहरणं देऊन , अतिशय साध्या-सोप्या शब्दांत , आपल्या रसाळ वाणीतून श्रीकाका महाराज सत्संगात प्रबोधन करतात. श्रीकाका महाराज नेहमी असं म्हणतात की , “आपला देह हा – प्रुथ्वी , आप , तेज , जल , वायु या पंचमहाभूतांचा बनला आहे. या देहाबरोबर येणारे भोग , संकटं , निर्माण होणा-या समस्या , प्रश्न हे देखील या पाच तत्वांमधून निर्माण होतात. या प्रश्नांवर , संकटांवर मात करण्यासाठी लागणारी शक्ती , योजावे लागणारे उपायही याच पाच तत्वांमधून प्राप्त होतात. त्याचबरोबर , ही शक्ती आणि उपायांची आपल्याला ओळख करून देणरे जे सद्गुरू तत्व आहे ते तत्वही याच पाच तत्वांमधे वास करून असतं. म्हणूनच प्रत्येकानी स्वतःमधल्या या मूळ सद्गुरू तत्वाची ओळख करून घेतली पाहिजे. म्हणजेच प्रत्येकानी स्वतःमधल्या त्या चैतन्यरूपी ईश्वरापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.”

आणि यासाठीच , सत्संगात श्रीकाका महाराज नामसाधनेचे महत्व अतिशय तळमळीने पटवून देतात. नामस्मरणाबरोबरच , सद्गुरूंच्या शिकवणीचा अंगीकार करून , त्यानुसार आचरण करून आजच्या धकाधकीच्या , तणावपूर्ण जीवनशैलीतही माणूस निर्भीड , आनंदी , समाधानी होऊ शकतो , हे अतिशय आग्रहाने सांगताना श्रीकाका महाराज म्हणतात , “केवळ सद्गुरूंचा सत्संग आणि अखंड नामस्मरणानीच माणूस भयमुक्त होऊन चिरंतन आनंद व समाधान मिळवू शकतो.”

श्रीकाका महाराजांच्या ओघवत्या , रसाळ वाणीतले त्यांचे सकारात्मक व संजीवक विचार ऐकणे आणि या सत्संगात सहभागी होणे हा एक अपूर्व आनंदाचा अनुभव असतो.