आगामी उपक्रम
मागोवा
वार्तापत्र र्वूत

मागोवा

मोफत दंत आणि आरोग्य चिकित्सा शिबिर माणिकबाग, सिहंगड रोड पूणे (२३-१२-२०१२)

दि. २३ डिसेंबर २०१२ ला संस्थेनी, सिंहगड रस्त्यावरील सांईनगर, माणिकबाग इथे मोफत दंतचिकित्सा व सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. सांईनगर व माणिकबाग भागातल्या १०० पेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला.

या शिबिरात औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांवर रचलेल्या ओवीबध्द नित्यपाठाचे वाटप शिबिरार्थींना करण्यात आले.

या शिबिरासाठी प्रसिध्द दंतचिकित्सक डॉ. सतिश कळसकर व नागपूरच्या प्रसिध्द डॉ. अश्विनी बुधे यांनी मोलाचे योगदान दिले.

दिवाळी निमित्त फराळ आणि जिवनोपयोगि वस्तूंच वाटप

प. पू. श्रीकाका महाराज म्हणतात, “दुस-याच्या चेह-यावरचा आनंद पाहून आपल्याला आनंद झाला पाहीजे. आपल्या बरोबरच दुस-याचाही विचार प्रत्येकानी केला पाहीजे.”

ही शिकवण डोळ्या पूढे ठेवून, आपला आनंद जास्तीत जास्त लोकांमधे वाटण्यासाठी, संस्था विविध सण विविध लोकांसोबत साजरा करते. नुकत्याच झालेल्या दीपावलीच्या निमित्तानी दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचं विविध ठिकाणि वाटप करण्यात आलं.

तसंच दिवाळी निमित्त, “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आश्रम, चिंचवड” येथील सूमारे २५० मूला – मुलिंना, नागपूर येथील श्रीकाका महाराजांच्या भक्तानी स्वतःशिवलेले नविन कपडे भेट देण्यात आले.

कपडे वाटप शिबिर “गुरूकूल” आश्रम, चिंचवड (२६-०८-२०१२)

गुरुकुलम्, चिंचवड येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरानंतर, तिथल्या गरीब व गरजू मुलांसाठी जुने परंतु चांगल्या स्थितीतले कपडे जमवण्याचं काम संस्थेनी हाती घेतलं. त्यासाठी विविध शाळांमधून व सोसायट्यांमधून कपडे देण्याचं आवाहन करण्यात आलं.

आदित्य गार्डन सिटी, वारजे येथे, रविवार दि.१९-०८-२०१२ ला कपडे जमवण्यासाठी एका छोट्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कपड्यांबरोबरच खेळणी, चादरी, ब्लॅँकेट्स इ. वस्तूही लोकांनी स्वेच्छेनी दिल्या.

चिंचवड येथील गुरुकुलम् आश्रमात झालेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे आणि कपड्यांचे वाटप, दि.२६-०८-२०१२ ला करण्यात आले.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर मातोश्री वृध्दाश्रम, नागपूर (१२-०८-२०१२)

दि. १२-०८-२०१२ ला संस्थेनी नागपूर येथील मातोःश्री वृध्दाश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं. वृध्दाश्रमात राहणार्या ८० वृध्द सदस्यांनी त्याचा लाभ घेतला. आरोग्य तपासणीबरोबरच मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. या शिबिरासाठी बहुमोल योगदान देणार्या डॉ. हर्षा वैद्य व डॉ. अश्विनी बुधे यांचे, संस्था मनःपूर्वक आभार मानते.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर “गुरूकूल” आश्रम, चिंचवड (२९-०७-२०१२)

चिंचवड येथील गुरूकूल या लहान मुलांच्या आश्रमात संस्थतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात आश्रमातील सर्व मुलांसह, तिथला शिक्षकवर्ग, तसेच सर्व कर्मचारी, अशा १९० जणांची शिबिरात तपासणी करण्यात आली.

डॅाक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे वाटप लवकरच आश्रमात करण्यात येणार आहे. तसंच ज्या मुलांना पुढील तपासण्या सांगितल्या आहेत, त्या तपासण्याही संस्थेतर्फे मोफत करून देण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी डॅा. सूरज नाईक व त्यांचे सहकारी, यांनी योगदान दिले. त्यासाठी संस्था त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.

एव्हरेस्टवीर, श्री. प्रसाद जोशी यांचा सत्कार (१०-०७-२०१२)

एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करून आपल्या देशाचं नाव उज्वल करणार्या श्री.प्रसाद जोशी यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. संस्थेचे काही विश्वस्त सदस्य आणि काही युवा सभासद यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले व संस्थेतर्फे एक छोटीशी भेट देऊन त्यांचा गौरव केला.

संस्थेतर्फे लवकरच श्री. प्रसाद जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. ज्यात सर्व सभासदांना त्यांचे थरारक अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे.

फणसराई येथे श्रीहनुमान मंदिराची स्थापना

फणसराईतल्या आदिवासी वस्तीतल्या ७ कुटुंबांना पक्की घरं बांधून दिल्यानंतर , त्यांना मानसिक शांतता लाभावी या हेतूने त्यांच्या वस्तीत एक हनुमानाचं मंदिर संस्थेनी बांधून दिलं आहे.

जिथे त्या लोकांना हनुमानाची उपासना करून मानसिक स्थैर्य आणि बळ मिळावं यासाठी जून २०१२ मधे संस्थेनी हनुमान मंदिराची स्थापना केली आहे. संस्थेच्या काही सभासदांनी स्वतः जाऊन मंदिराच्या बांधकामात सहभाग घेतला

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व त्रैमासिक “ अंतरंग ” चे प्रकाशन - पूणे (३०-०६-२०१२)

दि. ३० जून २०१२, आषाढी एकादशी – प.पू. श्रीकाकामहाराजांचे सद़्गुरू प.पू. श्रीगडबोले महाराज यांची पुण्यतिथी

या दिवशी संस्थेतर्फे ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प.पू. श्रीकाका महाराजांच्या प्रेरणेनी, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. यात अगदी लहान गटापासून पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश होता.

याच दिवशी, संस्थेतर्फे प्रकाशित होणार्या त्रैमासिक “ अंतरंग ” च्या दुसर्या अंकाचे प्रकाशन प.पू. श्रीकाका महराजांच्या हस्ते संपन्न झाले


कपडे वाटप - मातोश्री वृध्दाश्रम, नागपूर (०४-०६-२०१२)

३ जून २०१२ ला झालेल्या आरोग्य शिबिरानंतर, दि.४ जून २०१२ रोजी, संस्थेच्या नागपूरमधल्या सभासदांनी, नागपूर इथल्या मातोश्री वृध्दाश्रमात जाऊन तिथे राहणार्या गरजू, वृध्द नागरीकांना कपडे वाटप केलं.

मातोश्री वृध्दाश्रमासह, नागपूरमधल्या रस्त्यांवरून एक रॅली काढून रस्त्यांवर राहणार्या गरीब व गरजू लोकांनाही कपडे वाटप केलं..

वेळोवेळी संस्थेनी सभासदांना तसंच प.पू.श्रीकाका महाराजांच्या भक्तांना आव्हान केलं होतं. आणि त्यानुसार जुने परंतु सुस्थितीले कपडे गोळा करण्याचं काम चालू आहे. अशा असंख्य गरजू लोकांसाठी ब्लॅंकेट्स, साड्या, शर्ट्स इ. कपड्याची आवश्यकता आहे. अशा लोकांचा शोध घेऊन संस्था त्यांना कपड्याच्या स्वरूपात मदत करण्याचं कार्य करत असते. पुणे, नागपूर बरोबरच महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना मदत पुरवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

मोफत आरोग्य तपासणी तसेच नेत्र चिकित्सा व रक्त तपासणी शिबिर, नागपूर (०३-०६-२०१२)

 

प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या प्रेरणेनी व आशीर्वादानी संस्थेचं कार्य उत्साहात सुरु आहे. संस्था पुण्यासह पुण्याबाहेरही विविध ठिकाणी मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करते.

दि.०३ जून २०१२ रोजी , चटणवीसपूरा, नागपूर येथे संस्थेनी एक मोठ्या प्रमाणावर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं, जे खूप यशस्वी झालं. संस्थेनी प्रथमच, एकाच शिबिरात विविध मोफत आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध करून दिल्या.

अंदाजे ४०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सर्वसाधारण आरोग्य तपासणीबरोबरच मोफत रक्त तपासणी करण्यात आली, ज्यात रक्तातली साखर व हिमोग्लोबिन या तपासण्यांचा समावेश होता. अंदाजे १०० लोकांनी याचा लाभ घेतला.

मोफत नेत्र चिकित्सा करण्यात आली,ज्याचा लाभ अंदाजे २०० लोकांनी घेतला. त्यातून ३५ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नावनोंदणी करण्यात आली. या ३५ जणांच्या शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात , डॅा. महात्मे यांच्या Eye Hospital च्या सहाय्याने मोफत करून देण्यात येणार आहे

Cipla Pharmaceuticals आणि Dr. Reddy Laboratories यांनी गरजूंना मोफत औषधांचे वाटप केले.

Dr. Hedgewar Blood Bank च्या सहाय्याने रक्तदान शिबिरही घेण्यात आले. नागपूरच्या ४७ अंशांच्या उन्हाळ्यातही, २५ पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले.

डॅा. हर्षा वैद्य आणि डॅा. अश्विनी बुधे यांनी रोग्यांची सर्वसाधारण तपासणी करून बहुमूल्य योगदान दिले. यासाठी संस्था त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. त्याबरोबरच Cipla Pharmaceuticals, Dr. Reddy Laboratories, Dr. Mahatme Eye Bank and Eye Hospital, Dr. Hedgewar Blood Bank या सर्वांच्या सहकार्याबद्दल संस्था त्यांचेही मनःपूर्वक आभार मानते

मोफत दंत चिकित्सा शिबिर फणसराई व उदेवाडी (२०-०५-२०१२)

प.पू.सद्गुरूनाथ श्री काका महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, दि. २० मे २०१२ रोजी संस्थेनी लोणावळ्याजवळील फणसराई, वनाटी व उदेवाडी या आदिवासी वस्त्यांमधे मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन केले.

७५ पेक्षा जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यात मोठ्यांबरोबर लहानांचाही समावेश होता. मोफत चिकित्सेबरोबर मोफत औषधांचेही वाटप करण्यात आले. आणि दातांची स्वच्छता कशी राखावी याविषयी प्रबोधनही करण्यात आले. काहींच्या दाढा काढणे व दातांच्या इतर उपचारांसाठी लवकरच तिथे पुन्हा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रसिध्द दंतचिकित्सक डाँ.सतीश कळसकर यांनी या शिबिरासाठी केलेल्या योगदानासाठी संस्था त्यांची आभारी आहे.

कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू वाटप- फणसराई व उदेवाडी (०६-०५-२०१२)

प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेनी लोणावळ्याजवळील फणसराई व उदेवाडी या आदिवासी वस्त्यांच्या विकासाचं काम हाती घेतलं आहे. संस्थेचे सभासद नियमितपणे तिथे भेट देऊन तिथल्या लोकांना शक्य ती मदत देत असतात.

दि. ६ मे २०१२ रोजी संस्थेच्या काही सभासदांनी फणसराई व उदेवाडी या दोन्ही वस्त्यांना भेट दिली. तिथल्या आदिवासी लोकांना कपडे तसेच बादल्या, कळश्या, प्लास्टिकचे मग, साबण, कंगवे, तेलाच्या बाटल्या, काडेपेट्या इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

तसेच लहान मुलांना गोळ्यांची पाकीटे, बिस्कीटांचे पुडे इ. खाऊ वाटण्यात आला. त्या लोकांबरोबर चहापान करून व त्यांच्याशी संवाद साधून सर्वांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शक्य त्या मदतीचे आश्चासन दिले.

मोफत आरोग्य तपासणी शिबिर, अमृतनाथ स्वामी महाराज आश्रम, आळंदी (१७-०४-२०१२)

मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवाराच्या वतीने, दि. १७ एप्रिल २०१२ रोजी , अमृतनाथ स्वामी महाराज आश्रम, चाकण रोड, आळंदी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास स्थानिक तसेच एकादशीच्या निमित्ताने आळंदीला आलेल्या वारकर्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

सकाळी १० वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली. सुमारे १३० ते १५० लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. शिबिरार्थींना, प.पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या नित्यपाठ या ओवीबध्द पुस्तकाचे वाटपही करण्यात आले.

डॅा. सूरज नाईक यांचे संस्था मनापासून आभार मानते.

"अंतरग" - त्रैमासिक चे प्रकाशण (०१-०४-२०१२)

"मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे हीच ईश्वराची खरी पूजा आहे", असं कळकळीने सांगणारे परम पूजनीय सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज, मनुष्याने कसे वागावे, दुसर्याला दुखवू नये, दुसर्याच्या चेहर्यावरचा आनंद पहायला शिकावे, "नामसाधना आणि सद्गुरूतत्व" हे सूत्र मनात दृढ करून मनुष्य स्वतःचा उध्दार स्वतःच करू शकतो व आपले जीवन आनंदी व निर्भीड बनवू शकतो, हे आणि असे जीवनविषयक विचार त्यांच्या सत्संगातून सांगत असतात.

श्रीमहाराजांचे हे अमृतमयी विचार जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांना खर्या आनंदाची ओळख करून घेण्याची ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने संस्थेनी "अंतरंग" हे त्रैमासिक प्रकाशित केलं आहे.

श्रीरामनवमी, श्रीगुरुपौर्णिमा, दसरा(विजयादशमी), श्रीदत्तजयंती हे श्रीमहाराजांच्या सांईमंदिरात साजरे होणारे चार प्रमुख उत्सव आहेत. या चार उत्सवांना या त्रैमासिकाचे चार अंक प्रकाशित होतील

त्यानुसार सुरुवातीचा पहिला अंक रामनवमीला, दि.१ एप्रिल २०१२ या दिवशी प.पू.श्रीकाका महाराजांच्या हस्ते प्रकाशित झाला. हा अंक श्रीमहाराजांच्या सांईमंदिरात उपलब्ध आहे.

उदेवाडी व फणसराई चा विकास (१२-०२-२०१२)

प.पू.सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली, संस्थेनी फणसराई तसेच तिथल्या आसपासच्या इतर वस्त्यांच्या विकासाचं कार्य हाती घेतलं आहे.फणसराई येथे पक्की घरे बांधून दिल्यानंतर, प.पू.श्रीकाकामहाराजांच्या एका भक्तांच्या सहाय्याने तिथे सौरऊर्जेचे दिवेही बसवून दिले.

याच विकासकार्यानुसार संस्थेनी फणसराईजवळील उदेवाडी येथे भेट देउन,दि १२-०२-२०१२ या दिवशी तिथल्या लोकांना, बादल्या,कळश्या,कंगवे, तेलाच्या बाटल्या,काडेपेट्या, साबण इ. गृहोपयोगी वस्तू, तसेच कपड्यांचेही वाटप करण्यात आले.यात संस्थेच्या लहान-मोठ्या सदस्यांनी सहभाग घेतला.तिथल्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर शक्य ती मदत करण्याचं आश्वासनही दिले.

मोफत आरोग्या शिबिर, संकल्प वृध्दाश्रम, डोणजे (२६-०१-२०१२)

मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा, हे बोधवाक्य समोर ठेवून गरीब व गरजू नागरीकांना मदत करण्याचे काम चालू ठेवीत प. पू. श्रीकाका महाराज सेवा परीवाराच्या वतीने दिं. २६-०१-२०१२, रोजी डोणजे येथील संकल्प वृध्दाश्रन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आला. अशा प्रकारचे ट्रस्टच्या वतीने या वर्षात घेण्यात आलेले पहिलेच शिबीर होते व त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.

सकाळी ९ वाजल्यापासून आश्रमातील वृध्द लोकांचे Blood Sugar Fasting & Postprandial E.C.G ( Electrocardiogram ) B . P ( Blood Pressure ) घेण्यास सुरवात करण्यात आली. आश्रमातील २५ लोक व गावातल्या अनेक लोकांनीही या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. त्यानंतर तेथील सर्व लोकांना नित्यपाठाची पुस्तके व तिळगूळ देण्यात आले. संस्थेच्या सभासदांनी तिथल्या लोकांना नित्यपाठ वाचून दाखवला. संस्थेच्या सभासदांनी आश्रमातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेतल्या.

संत कबीर रहीवासी मुलांचे वसतीगृह येथे मोफत आरोग्य तपासणि व धान्य, कपडे व वस्तु वाटप (२६-०१-२०१२)

न्यासातर्फे दिं. २६-०१-२०१२, रोजी प्रबुध्द फाऊंडेशन संचालित संत कबीर रहीवासी मुलांचे वसतीगृह, पंचशील नगर येथे भेट देण्यात आली. या वेळी वसतीगृहातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मुलांना त्यांच्या आजारानुसार म्हणजेच सर्दी, खोकला, पोटातील जंत वगैरे यांवर मोफत औषधे देण्यात आली. तिळगूळ देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. तसेच त्या मुलांना प.पू.सदगुरू श्रीकाका महाराजांच्या प्रेरणेने २५ किलो तांदुळ, खोबरेल तेलाच्या बाटल्या, अंगाचा साबण, कपडयाचा साबण, काडेपेटया अश्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. तसेच त्या मुलांना कपडयांचे वाटपही करण्यात आले. त्या मुलांच्या चेहर्यांवरचा आनंद बघून श्रीसद्गुरूंच्या शिकवणीची सार्थता लक्षात आली.

मकर संक्रत साजरा

प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांचे विचार , त्यांची शिकवण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी या हेतूने , त्यांच्याच प्रेरणेने व प्रोत्साहनाने पुण्यात सहा ठीकाणी व नागपूर येथे एका ठीकाणी सत्संगाचे आयोजन केले जाते.

मकर संक्रातीच्या निमित्ताने या सत्संगातून , सेवापरिवारातर्फे तिळगुळ समारंभ साजरा करण्यात आला.

या तिळगुळ समारंभात , तेलाच्या बाटल्या , कंगवे , टॉवेल्स् , तांदुळ इ. वस्तू भेट देण्यात आल्या. श्रीसद्गुरुंचे अमृतबोल असलेले,‘मंथन – अमृतधारा भाग ३’ हे पुस्तकही प्रतेकाला भेट देण्यात आले . त्याचप्रमाणे श्रीसद्गुरूंचा लेखी संदेश सर्वांना वितरित करण्यात आला .‘ तिळगुळ घ्या, गोड बोला ’ असे म्हणून ,’ जय सांईराम ’ या परवलीच्या शब्दानी या समारंभाची सांगता करण्यात आली.

सत्संग

सत्संग’ हा श्रीकाका महाराजांचा अत्यंत आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय. हा सत्संग २००० सालापासून श्रीमहाराजांच्या सांईमंदिरात अविरत चालू आहे.

श्रीकाका महाराजांच्या नुसतं कानावर घातल्याने कसल्याही जीवघेण्या संकटातून जगातला कुठलाही माणूस निभावून जातो हा अनेक वर्षांचा अनुभव आहे. परंतु एक समस्या सुटली की दुसरी समोर उभीच आहे. मग ज्या आनंदाची मला माझ्या श्रीसद्गुरूंनी ओळख करुन दिली तशी ती प्रत्येकाला कधी होणार ? हा विचार श्रीकाकामहाराजांच्या मनात सुरु झाला आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा सत्संगाचा प्रपंच सुरु केला. मूळचे मितभाषी असलेले श्रीकाका महाराज या सत्संगाच्या माध्यमातून बोलू लागले, सर्वांशी संवाद साधू लागले, इतकंच नाही तर सामान्यांनाही बोलतं करू लागले. आणि हा सत्संग उत्तरोत्तर रंगत गेला, विस्तारत चालला.

श्रीकाका महाराज अंतर्ज्ञानी आहेत, सर्वज्ञ आहेत. गरजूंच्या छोट्या छोट्या अडचणी जाणून घेतात, यातूनच या सत्संगाचा विस्तार करण्याचं त्यांनी ठरवलं. आपल्यापासून लांब राहणार्या लोकांसाठी त्या, त्या वस्तीत जाऊन सत्संग सुरु करण्याचं ठरलं आणि त्यांच्या आशीर्वादाने आज पुण्यात सहा ठिकाणी आणि नागपूरला एका भक्तांच्या घरी सत्संगाचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे.

या सत्संगात महाराजांच्या रसाळ आणि मधुर वाणीतील प्रवचने प्रत्यक्ष त्यांच्या आवाजात आठवड्यातून एकदा आपल्याला ऐकायला मिळतात. श्रीकाका महाराजांच्या प्रवचनांचा प्रभाव असा की एकदा लक्षं देऊन ऐकलं की त्यातील विचार कित्येक दिवस आपल्या मनात घोळत राहतात आणि परत परत ऐकलं तरी दर वेळी काही नविन शिकायला मिळतं. अगदी रोज आपल्या घरात घडणार्या गोष्टींचे दाखले देऊन श्रीमहाराज हा सत्संग आपल्यात रुजवतात, आपल्याला निर्भीड तसंच आनंदी बनवतात. कसल्याही परिस्थितीचा, संकटाचा सामना करण्याचं बळ या सत्संगातून मिळतं. श्रीमहाराज आपल्याला नामसाधनेकडे वळवतात. अध्यात्म अगदी सोपं करून सांगतात.

या पवित्रं, मंगलमय सत्संगाचा आनंद जास्तीत जास्त लोकांना मिळावा ही सद्गुरू श्रीकाका महाराजांच्या चरणी प्रार्थना !

परम पूजनीय सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांची ओजस्वी, चैतन्यमयी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेतर्फे खालील ठिकाणी सत्संगाचे आयोजन केले जाते.

  1. श्रीसांईमंदिर, कर्वेनगर, पुणे.

  2. सांईनगर, माणिकबाग, पुणे.

  3. शाहू कॉलनी, कर्वेनगर, पुणे.

  4. दत्तवाडी, सिंहगड रस्ता, पुणे.

  5. मातृकुल वृध्दाश्रम, पर्वती पायथा, पुणे.

  6. संकल्प आश्रम, डोणजे, पुणे

  7. हिवसेवाडा, चिटणीसपूरा, नागपूर.