श्री. काका महाराजांविषयी

प. पु. सद्गुरू श्री. काका महाराजांविषयी

श्रीसद्गुरू हे सर्व विश्व व्यापून राहिलेले असतात. सद्गुरू तत्व हे सूक्ष्माहून सूक्ष्मात व्याप्त असतं , ते आगम-निगमाच्या पलीकडे चिरंतन , शाश्वत असतं. सर्वसामान्य माणसानी त्याच्या दैनंदिन जीवनात निर्भीड , आनंदी व समाधानी व्हावं आणि त्याबरोबरच त्यानी स्वतःची खरी ओळख करून घ्यावी यासाठी हे सद्गुरू तत्व वेळोवेळी , वेगवेगळ्या रूपात या भूमीवर अवतरित होऊन कार्यरत असतं. प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराज हे असंच एक सद्गुरू तत्व आहे , ज्यांचे लाखो अनुयायी / भक्त आहेत , जे आपल्या व्यावहारिक तसंच आध्यात्मिक जीवनात आनंदी , समाधानी झाले आहेत. प.पू.श्रीकाका महाराज म्हणतात , “परमेश्वराच्या अखंड नामस्मरणाने आणि श्रीसद्गुरूंनी आखून दिलेल्या रस्त्यावर मार्गक्रमण केल्याने मनुष्याला शाश्वत आनंदाची ओळख होते आणि तो समाधानी होतो.”

आमचे सद्गुरू, प.पू.श्रीकाका महाराज १९७५ सालापासून मानवसेवेचं कार्य करत आहेत. ते आपल्या प्रवचनांमधून रंजलेल्या – गांजलेल्यांना , जे जीवनात निराश झाले आहेत , दुःखी आहेत , या स्पर्धेच्या युगात जे थकले आहेत , ज्यांना दिशा सापडत नाहीये अशांना मार्गदर्शन करतात. ते सांगतात , “प्रत्येकानी व्यवहार आणि आध्यात्म यांची सांगड घालून आपलं दैनंदिन जीवन जगलं पाहिजे. अखंड नामसाधना , सद्गुरूंवरील निष्ठा , सद्गुरूंची शिकवण आणि सत्संग यांचा अंगीकार करून माणूस आनंदी व निर्भय होतो आणि त्याला अखंड मनःशांती व चिरंतन समाधानाची प्राप्ती होते. आजच्या ताणतणावाच्या आणि भयग्रस्त जीवनशैलीत माणसाला सत्संगाची नितांत आवश्यकता आहे.”

प. पू. सद्गुरू श्री काका महाराज यांचे संक्षिप्त चरित्र

प.पू.सद्गुरू श्रीकाका महाराज यांचा जन्म कोकणातील ’आंजर्ले’ या छोट्याशा खेड्यात , दत्तजयंतीच्या पावन दिवशी झाला. एका चित्पावन ब्राम्हण कुटुंबात , श्री. अनंत वैद्य व सौ. उषा वैद्य या दांपत्याला ’श्रीपाद’ (श्रीकाका महाराज)च्या रूपात ज्येष्ठ पुत्राची प्राप्ती झाली. या वैद्य घराण्यात पिढीजात दत्तोपासना चालत अलेली असल्याने छोट्या श्रीपादलाही वयाच्या चौथ्या वर्षापासून दत्तभक्तीची ओढ निर्माण झाली. श्रीकाका महराजांचे बालपण अतिशय कष्टमय गेले. अत्यंत हालाखीच्या , खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत श्रीकाका महाराजांनी उत्तम शिक्षण घेऊन अभियंत्याची पदवी संपादन केली. त्यानंतर एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरी मिळवली. १९७३ साली श्रीकाका महाराजांचा विवाह , जयश्री शंकर दामले यांच्याशी झाला. याच काळात श्रीकाका महाराजांच्या परिवारावर एक मोठं संकट कोसळलं. अतिशय प्रतिकूल आणि भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग नसताना , वैद्य परिवाराची भेट प.पू.श्रीगडबोले महाराज (श्रीकाका महाराजांचे प.पू.श्रीसद्गुरू) यांच्याशी झाली. प.पू.श्रीगडबोले महाराजांनी श्रीकाका महाराजांच्या परिवाराला त्या विचित्र संकटातून लीलया बाहेर काढलं.

प.पू. श्रीगडबोले महाराजांच्या भेटीनंतर श्रीकाका महाराजांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. प.पू.श्रीगडबोले महाराजांनी आपल्याकडील दिव्य सामर्थ्य श्रीकाका महाराजांना देण्याची इच्छा बोलून दाखवली. ते श्रीकाका महाराजांना म्हणाले , “मी तुझी गेली १००० वर्षे वाट पहात आहे.” श्रीकाका महाराजांनी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानली. १९७५ साली श्रीगडबोले महाराजांनी श्रीकाका महाराजांना दीक्षा दिली. त्या क्षणापासूनच श्रीकाका महाराजांनी , आपल्या श्रीसद्गुरूंचं मानवसेवेचं कार्य हेच आपलं जीवितकार्य मानलं. १९७५ सालीच , श्रीसद्गुरूंच्या आज्ञेनुसार श्रीकाका महाराजांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते कोकणातल्या त्यांच्या आंजर्ले या गावी वास्तव्यास गेले. कोकणात ७ वर्षे त्यांनी , सद्गुरूंनी सांगितलेली तीव्र साधना केली. कोकणातही त्यांनी हजारो रंजल्या – गांजलेल्यांना मार्गदर्शन करून दुःख्मुक्त केलं. या मधल्या काळात त्यांना दोन कन्यांची प्राप्ती झाली. १९८१ साली श्रीकाका महाराज परिवारासह पुण्यास परत आले. त्यानंतर काही महिन्यांतच श्रीकाका महाराजांचे सद्गुरू , प.पू.श्रीगडबोले महाराजांनी देह ठेवला.

पुण्याला आल्यावर , बिकट परिस्थितीतून काळ क्रमत असतानाही श्रीकाका महाराजांनी मानवसेवेचं , लोककल्याणाचं आपलं व्रत अखंड चालू ठेवलं. १९८६ साली त्यांनी पुण्यात , आनंदनगर येथे छोटंसं घर बांधलं. १९८७ साली , श्रीदत्तगुरुंच्या द्रुष्टांतानुसार , आपल्या घराच्या आंगणात एका दत्तमंदिराची स्थापना केली. तसच १९८८ साली श्रीसांईबाबांच्या द्रुष्टांतानुसार घराच्या वरच्या बाजूला श्रीसांईमंदिराची स्थापना केली. श्रीमहाराजांच्या या मंदिरात जात - पात , धर्म - पंथ , उच्च – नीच , गरीब – श्रीमंत अशा कोणत्याही भेदभावाला जागा नाही. तसेच कर्मकांडं , अवडंबर , अंधश्रध्दा , सोवळं – ओवळं यांना स्थान नाही. स्वतः श्रीकाका महाराज कोणत्याही संप्रदायाचं किंवा पंथाचं समर्थन करत नाहीत.

श्रीकाका महाराजांकडे ; विविध समस्यांवर , प्रश्नांवर मार्गदर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांना आध्यात्माची , ईश्वरभक्तीची गोडी लागावी या हेतूने श्रीमहाराजांनी त्यांच्या सांईमंदिरात आरती , भजन , सत्संग इत्यादी कार्यक्रम सुरु केले.

मंदिरात येणा-या अनेक लोकांना श्रीमहाराजांनी अघोरी चाली-रीती , समजूती , अंधश्रध्दा इत्यादींमधून बाहेर काढले. भोंदू बाबा , बळी देणे वगैरे अघोरी व अमानवी प्रथांपासून पराव्रुत्त केले आणि त्यांना जीवनाकडे बघण्याचा नवा द्रुष्टीकोन दिला. सोवळं-ओवळं , कर्मकांडाचे अवडंबर यांमधे अडकलेल्या कित्येक भयग्रस्त लोकांना त्यांच्या भीतीतून बाहेर काढलं व त्यांना नामसाधनेकडे वळवले. कित्येक लोकांना व्यसनातून मुक्त केले. १९७५ साली श्रीमहाराजांनी घेतलेले जनकल्याणाचे असिधारा व्रत अखंड , अविरत सुरु आहे. स्वतः खडतर मार्ग क्रमत असतानाही , दुस-यांना जीवनमार्ग सोपा - सुगम होण्यासाठी मार्गदर्शन केले , मानसिक आधार दिला , सकारात्मक द्रुष्टीकोन दिला , अनेक निराश मनांना जीवनाची नवी दिशा दिली.

अशा या श्रेष्ठ विभूतीला , प.पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराजांना हे संकेतस्थळ न्यासाने समर्पित केले आहे.

// जय सांई राम //


प. पू. श्री. गडबोले महाराज

सद्गुरू परंपरा

प.पू.श्रीकाका महाराजांचे सद्गुरू , प.पू.श्रीगडबोले महाराज हे मूळचे कोकणातले. बालपणीच , म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षीच ते कोकण सोडून पुण्याला आले. अत्यंत खडतर परिस्थितीत , अतिशय कठीण परिश्रमांनी जीवन निर्वाह करीत असताना लहान वयातच त्यांना जीवनाचे गूढ शोधण्याची ओढ लागली. आणि त्यासाठी त्यांनी , पुण्यातील पाताळेश्वर येथे १२ वर्षे तीव्र साधना केली. कठीण साधनेच्या मुशीतून तावून-सुलाखून प.पू.श्रीगडबोले महाराजांची साधना सिध्द झाली , त्यांच्या साधनेला सोन्याची झळाळी आली.

त्यानंतर श्रीगडबोले महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठीच वेचले. आयुष्यभर आपला देह लोकांसाठी झिजवला. त्यांनी कित्येकांचे अश्रू पुसले , असंख्य लोकांना दुःखमुक्त करून आनंदी व समाधानी केले. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक व प्रसन्न होते. त्यांची विचारधारा अतिशय सकारात्मक आणि पुरोगामी होती.

१९८१ साली, आषाढी एकादशीला , वयाच्या १०५ व्या वर्षी प. पू. श्रीगडबोले महाराजांनी देह ठेवला.

श्रीसद्गुरू उपदेश

प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज म्हणतात , “मनुष्याचे प्रश्न कधीच संपत नाहीत. येणा-या प्रश्नांपासून , संकटांपासून दूर पळून न जाता , त्या प्रश्नांना , संकटांना समर्थपणे तोंड देण्याची , त्यांचा सामना करण्याची , त्यांच्यावर मात करण्याची शक्ती , साहस नामसाधनेनेच प्राप्त होते. ती शक्ती अंधश्रध्देच्या मार्गाने , तंत्र-मंत्र , अघोरी प्रथा-परंपरा-साधना , दुस-यांना त्रास देऊन अथवा बळी-उतारे देऊन येत नाही , हे सर्व अमानवी उपाय आहेत. केवळ नामसाधना हाच सर्वात श्रेष्ठ , सोपा मार्ग आहे. नामसाधनेच्या मार्गानी त्या प्रश्नांना बरोबर घेऊन , आनंदाने व निर्भीडपणे जीवन जगण्याची कला सद्गुरू शिकवतात.”

 

त्याचबरोबर श्रीकाका महाराज म्हणतात , “माणसाने माणसाशी माणसासारखे वर्तन ठेवावे. स्वतःच्या सुखाबरोबर दुस-यांच्या सुखाचाही विचार केला पाहिजे. दुस-यांच्या चेह-यावरचा आनंद बघून आपल्याला होणारा आनंद हाच खरा आनंद असतो. आणि हा आनंद मिळवण्यासाठी लागणारी विचारधारा , मनोवस्था ही सत्संगानीच प्राप्त होते. तसेच , आजच्या तणावग्रस्त , अनिश्चिततेच्या काळात केवळ सद्गुरूंचा सत्संगच माणसाला भयमुक्त आयुष्याचा मार्ग दाखवतो.”

श्रीसद्गुरूंची अम्रुतवाणी (१३/०४/२०२४)

जसे संस्कार आई आपल्या मुलांवर करत असते, तसेच संस्कार श्री सद्गुरू आपल्या शिष्यांवर करत असतात. हे संस्कार करण्याचे कार्य करत असतांना ते आपल्या शिष्याची श्रध्दा बळकट करण्याचे काम करत असतात. 

जात्यावर धान्य दळत असतांना जो खुंटा हातात धरून जाते फिरवायचे असते, तो बळकट असावा लागतो, म्हणजेच तो जात्यामध्ये घट्ट बसवावा लागतो. तरच ते धान्य दळून होते. नुसता दळणारा बळकट असेल अगर त्याची दळण्याची इच्छा बळकट असेल, तरीही बळकट व घट्ट खुंट्याशिवाय धान्य दळले जात नाही. 

त्यासाठी खुंट्या खाली नारळाची शेंडी घालून मग तो घट्ट बसवतात. शिष्याच्या जीवनात अनेक चांगले वाईट प्रसंग येतात, त्या प्रसंगात त्याला श्री सद्गुरूं कडून मिळालेले मार्गदर्शन व आधार याच्यामुळे तो श्रध्देचा खुंटा बळकट व मजबूत झालेला असतो. एकदा का हा श्रध्दा रूपी खुंटा मजबुत व बळकट झाला की मग या जीवनातील अनेक चांगले वाईट प्रसंग या भवसागरातील जात्यात सहज भरडून जातात. आपण खंबीरपणे व तटस्थपणे हा भवसागर पार करतो व आनंदी यात्री बनतो.

श्रीसद्गुरूंची अम्रुतवाणी (१०/०५/२०२४)

श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शना प्रमाणे जर नाम घेतलं तर माणूस अंतर्बाह्य पालटतो. त्याचे आचार-विचार पालटतात. त्याची प्रत्येक कृती ही चांगल्यासाठीच होते. नुसती नजरच नव्हे तर चेहरापट्टीसुध्दा बदलते. इतकी ताकद नामात आहे.

नुसतं श्री सद्गुरूंच्या समोर त्यांच्या सत्संगात बसलं तरी कितीतरी बदल होतो, आणि जर नाम भिनलं आणि नामाची म्हणजेच श्री सद्गुरूंची खरी ओळख झाली की एकवेळ अशी येते की, “मी नाम घेत आहे की श्री सद्गुरू!” ही जाणीवही रहात नाही.

पण दृढ विश्वास हवा, श्रध्दा बळकट हवी, एकदा श्री सद्गुरूंना आपलं म्हणलं की कोणतीही शंका घेऊ नये. अशी धारणा हवी की “श्री सद्गुरू जे करतील ते चांगल्यासाठीच” ही धारणा पक्की झाली, आणि अहंभाव नाहीसा झाला की नामाची म्हणजेच श्री सद्गुरूंची खरी ओळख होते. आणि ही ओळख झाली की समाधान मिळतं, आणि केवळ आनंदच उरतो, जो चिरतन रहातो

चित्रदर्शन